महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । मागील काही महिन्यांपासून नाममात्र दराला मिळणारी झेंडूची फुले नवरात्रोत्सव सुरू होताच महाग झाली आहेत. या फुलांचा दर २० टक्क्यांनी वाढला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्याच्या विविध भागांतून फूल विक्रेते, स्थानिक विक्रेत्यांनी झेंडू आणि इतर फुले खरेदीसाठी गर्दी केली आहे. ही गर्दी दसरा-दिवाळीपर्यंत राहील, असे फूल बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले.
करोना महासाथीमुळे गेल्या दीड वर्षांत शेतकऱ्यांनी लागवड केलेली गुलाब, मोगरा, झेंडू, अष्टर, शेवंती, गुलछडी, लिलीची फुले बाजारपेठ नसल्याने शेतात फुलून कुजली. काही शेतकऱ्यांनी ही फुले कल्याण बाजारात विक्रीसाठी आणली होती. या फुलांना भाव नसल्याने आणि वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी शहरी बाजारात फुले आणून विकणे बंद केले होते. फूल बाजाराला बाजारात भाव नसल्याने मुरबाड, शहापूर भागातील अनेक शेतकऱ्यांनी फूल शेतीत मका, चाऱ्याची व्यापारी पिके घेऊन शेतीत उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला.
कठोर निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठय़ा हौशेने बुधवारपासून कल्याण कृषी बाजार समितीत झेंडू आणण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी बाजार समितीमधील फूल बाजारात तेराशे िक्वटल झेंडू फुलांची आवक झाली. नवरात्रीचे नऊ दिवस, दसरा-दिवाळीपर्यंत फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात होईल, असे बाजार समितीचे सहसचिव दयानंद पाटील यांनी सांगितले.
फुलांचे दर
(रुपये प्रतिकिलो)
झेंडू ४०
अस्टर ६०
काकडा ४०
लिली ६०
गुलाब ४०
शेवंती ४०
मोगरा २०० गुलछडी २०० (जुडी)