महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । डिजिटल आणि उपग्रहांकित युगात कालबाह्य यंत्रणा असलेली देशभरातील दूरदर्शनची ५१० लघु व उच्चशक्ती (एलपीटी-एचपीटी) प्रक्षेपण केंद्रे ३१ ऑक्टोबर २०२१ व ३१ मार्च २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश प्रसारभारती दूरदर्शन महानिदेशालयाने काढले आहेत.
या केंद्रांच्या ठिकाणची डीडी अॅनॉलॉग टेरेस्ट्रिअल टीव्ही ट्रान्समीटर (एटीटी) यंत्रणा असून आधुनिक डिजिटल, उपग्रहांकित माध्यमांच्या (सॅटेलाइट) तुलनेत जुनी, कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या ५१० बंद होणाऱ्या केंद्रांमध्ये औरंगाबाद केंद्रांतर्गत येत असलेले सटाणा, जालना, तसेच महाराष्ट्रातील अकोला, अचलपूर, अंबाजोगाईजवळील पिंपळा (धा.), कोल्हापूरअंतर्गतचे चिपळूण, देवरुख, राजापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, बीड, अहमदनगर, बुलडाणा आदी केंद्रांचा समावेश आहे.