Success Story: वडील करतात पेट्रोल पंपावर काम आणि लेकीला मिळाला IIT मध्ये प्रवेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर । इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे (Indian Oil Corporation) अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी नुकतीच शेअर केलेली एक प्रेरणादायी गोष्ट या गुणांची साक्ष देते. ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून श्रीकांत वैद्य यांनी आर्या राजगोपालन (Arya Rajagopalan) हिची कथा जगासमोर आणली असून, ती एका पेट्रोल पंप अटेंडंटची (Petrol Pump Attendant) मुलगी आहे. या एका छोट्याशा, पण प्रेरणादायी कथेत तिने कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे शेअर केलं आहे.

आर्याचे वडील 2005पासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्याच पेट्रोल पंपावर अटेंडंट म्हणून नोकरी करतात. आर्यानं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (NIT) पदव्युत्तर पदवी मिळवली असून, ती आता देशातल्या सर्वांत प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी एक असलेल्या महाविद्यालयात प्रवेश करणार आहे. ती आता पेट्रोलियम अभियांत्रिकी (Petroleum Engineering) या विषयात एमटेक करणार आहे.

अन्य नागरिकांना यापासून प्रेरणा मिळावी, यासाठी श्रीकांत वैद्य यांनी ही बातमी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. यासोबतच वैद्य यांनी ज्या पेट्रोल पंपावर गेल्या 15 वर्षांपासून आर्याचे वडील काम करतात, त्या पेट्रोल पंपावर काढलेला आर्या आणि तिच्या वडिलांचा फोटोदेखील शेअर केला आहे. याबाबत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी सांगितलं, की `आर्याचा निर्धार आणि समर्पित भावनेनं केलेल्या परिश्रमांचा कंपनीतल्या प्रत्येकाला अभिमान आहे.`

सोशल मीडिया युझर्सनी आर्याचं यश आणि तिच्या वडिलांनी वर्षानुवर्षं केलेले प्रयत्न पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. वैद्य यांच्या या पोस्टला 12 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून, कमेंट सेक्शनमध्ये अनेक नेटिझन्सनी आर्याचं कौतुक केलं आहे. सर्व स्तरांतून अभिनंदन होत असलेल्या या तरुणीचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनीही कौतुक करून अभिनंदन केलं आहे. आर्या राजगोपालन हिचा आणि तिचे वडील राजगोपालन यांचा देशातल्या ऊर्जा क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान आहे. ही बापलेकीची जोडी नव्या भारतासाठी प्रेरणादायी आणि आदर्श असल्याचं पुरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रिपब्लिकशी बोलताना, आर्याच्या वडिलांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे तिच्या वतीने आभार मानले. तसंच त्यांनी आपल्या मुलीचं भविष्य आशादायी असल्याचं सांगितलं. ‘2005पासून मी ज्या कंपनीत काम करत आहे, त्या इंडियन ऑइल कंपनीत मुलीलाही भविष्यात नोकरी मिळाली तर ती माझ्यासाठी नक्कीच आनंदाची आणि आश्चर्याची बाब ठरेल,’ असंही राजगोपालन यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *