सहावी माळ : नवदुर्गेचे सहावे स्वरुप कात्ययणी; ‘असा’ मिळवा आशिर्वाद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । ललिता पंचमीनंतर सरस्वती पूजनाची तयारी सुरू झाली आहे. दुर्गा देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यापैकी सोमवार, ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सरस्वती पूजन केले जात आहे. याच दिवशी नवरात्राची सहावी माळ आहे. नवदुर्गेचे सहावे स्वरुप कात्यायणी देवी आहे. दुर्गा देवीचे कात्यायणी स्वरुप, महती, महत्त्व, मान्यता, पूजाविधी, मंत्र, लाभ यांविषयी जाणून घेऊया…

कात्यायणी देवीचे स्वरुप
ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.

कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.

कात्यायणी देवीचा मंत्र

कात्यायणी देवीचे पूजन केल्यानंतर खाली दिलेल्या मंत्रांचा यथाशक्ती आणि यथासंभव जप करावा, असे सांगितले जाते.

“कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥”

कात्यायणी देवी पूजनाचा लाभ

दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायणी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे. एका कथेनुसार, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायणी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा, यासाठी कात्यायणी देवीचे पूजन केले होते, असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *