पुणेकरांना स्टॉबेरी मिळणार घरपोच; पोस्टाची सुविधा उपलब्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर । काळानुसार ग्राहकाभुमिख सुविधा देण्याऱ्या पोस्टाने आता पुणेकरांना घरपोच स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वरचे पदार्थ देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महाबळेश्वरमध्ये यासाठी पोस्टाने नुकतेच एक केंद्र सुरू केले आहे. तिथे भटकंतीला गेल्यावर खरेदी केलेली, ऑर्डर दिलेली स्ट्रॉबेरी आणि इतर पदार्थ नागरिकांना टपाल खात्यातर्फे व्यवस्थित ‘पॅकिंग’ करून घरपोच पाठविण्यात येणार आहेत. पुढच्या महिन्यापासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू झाला आहे.

‘टपाल विभागाने अलीकडचे जीआय मानके मिळालेल्या प्रादेशिक उत्पादनांची विशेष टपाल पाकिटे प्रसिद्ध केली आहेत. या वेळी शेतकरी संस्थांनी पोस्टाने स्ट्रॉबेरी, वाघ्या घेवड्यासाठी टपाल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या धर्तीवर महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हंगामासाठी ‘मॅप्रो’जवळ आम्ही स्वतंत्र केंद्र सुरू केले आहे. पर्यटकांना त्या भागात खरेदी केलेली स्ट्रॉबेरी आणि इतर खाद्य पदार्थ आपापल्या घरी पाठवता येतील,’ अशी माहिती पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल मधुमिता दास यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

टपाल विभागातर्फे या आठवड्यात राष्ट्रीय टपाल सप्ताहामध्ये राबविलेल्या उपक्रमांची माहिती देताना दास म्हणाल्या, ‘पुणे विभागामध्ये पहिल्या दिवशी सात हजार ८९९ खाती उघडण्यात आली. दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक नागरिकांनी जीवन विमा योजनेचा लाभ घेतला. याशिवाय स्वातंत्र्यवीरांचे विशेष टपाल तिकीट, आधार नोंदणी शिबिर असे उपक्रम राबवले असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विविध गुंतवणूक योजनांबरोबरच मोबाइल रिचार्ज, वीजबिल, गॅस बुकिंग अशा सुविधा आम्ही देत आहोत. लवकरच पोस्टात रेल्वे तिकीट बुकींगची सोय उपलब्ध होणार आहे,’ असेही दास यांनी सांगितले.

‘पुणे विभागांतर्गत येणाऱ्या आठ पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) सध्या कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरात या केंद्रांवर २२ हजारांहून अधिक पासपोर्ट अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. शहराच्या उपनगरांमध्ये; तसेच ग्रामीण भागात नव्याने सुरू झालेल्या टपाल कार्यालयांमध्ये ‘पीओपीएसके’ हवे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नागरिकांच्या दृष्टीने हे सोयीचे आहे. या संदर्भात पुणे पासपोर्ट विभागाशी चर्चा करणार आहे, असे मधुमिता दास यांनी सांगितले.

लोकांच्या आग्रहास्तव शहरातील काही पोस्ट कार्यालयांच्या कामाच्या वेळा आम्ही वाढवल्या आहेत. जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) रात्री ८ पर्यंत, तर येरवडा पोस्ट ऑफिस, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस संध्याकाळी सहा, हिंजवडी पार्क आणि पिंपरीतील पोस्ट ऑफिसचे काम संध्याकाळी ५.३० सुरू राहणार आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून इतर पोस्ट ऑफिसच्या वेळा टप्प्याटप्याने वाढविण्यात येणार आहेत.

पुणे विभागातील प्रमुख शहरांमध्ये रात्रभर टपाल वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. यामु‌ळे ग्राहकांनी आज स्पीड पोस्टमध्ये पाठवलेले टपाल दुसऱ्याच दिवशी इच्छित स्थळी पोहोचणे शक्य होणार आहे. ‘आत्तापर्यंत पोस्टाची वाहने दिवसा प्रवास करत होती. ती आता रात्रीही प्रवास करतील. वाहनांना जीपीएसने जोडले असल्याने त्यांचा प्रवास ‘मॉनिटर’ होणार आहे. सरकारी आणि खासगी उद्योगांना अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आमच्या मेल मोटर शेड्यूलमधील जागा देणार आहोत,’ असे मधुमिता दास यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *