नोकऱ्याच नाहीत, तर आरक्षण देणार कुठून? : नितीन गडकरी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मत मांडले आहे. देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार मात्र कुणी करत नाही. मुळात सरकारी नोकऱ्याच नाहीत तर, त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.

आरक्षणाचा प्रश्न हा नैराश्यातून निर्माण झाला आहे. त्याचे कारण ग्रामीण भागात रोजगार नाही. शैक्षणिक सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या कुठे आहेत? असा मुद्दा गडकरी यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी उपस्थित केला होता. तर, शनिवारी देखील त्यांनी हाच मुद्दा पुन्हा मांडला.

वनराई फाऊंडेशनच्या वतीने कमानी ट्युब्जच्या अध्यक्ष पद्मश्री कल्पना सरोज यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि पैसा मिळतो. येणारा काळा हा ड्रोन तंत्रज्ञानाचा आहे आणि त्यामुळे आपले जगणे बदलणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक बनू शकतो आणि त्याचा कोणत्याही जात, पंथ, धर्म, भाषेशी संबंध नाही. व्यक्तीच्या चांगुलपणाचा आणि गुणवत्तेचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे विविध विषय शिकवणारी महाविद्यालये आहेत. पण, उद्योजकता शिकवणाऱ्या संस्था नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सरोज यांच्यासारख्या यशस्वी उद्योजिकेने दलित समाजातील १०० तरुणींना उद्योजक म्हणून घडवावे. अशा प्रकारच्या प्रयत्नांतूनच आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल, असेही गडकरी म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वनराई फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. गिरीश गांधी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *