✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २२ डिसेंबर २०२५ | २०२५ हे वर्ष संपत असतानाच जगासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. कोरोना महामारीच्या आठवणी ताज्या असतानाच आता अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये ‘सुपर फ्लू’ नावाच्या नव्या विषाणूने खळबळ उडवून दिली आहे. या आजाराचा प्रसार झपाट्याने वाढत असून, तो पुढे जाऊन नव्या महामारीचे रूप धारण करेल का? अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
हा ‘सुपर फ्लू’ म्हणजे इन्फ्लूएंझा विषाणूचाच एक बदललेला आणि अधिक आक्रमक प्रकार असून, शास्त्रज्ञांनी त्याला ‘सबक्लेड के’ (Subclade K) असे नाव दिले आहे. सध्या उत्तर अमेरिकेसह युरोपातील काही भागांत या विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण बरे होत असले तरी नवीन रुग्णसंख्या थांबण्याचे नाव घेत नाही, हीच बाब आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची ठरत आहे.
ग्लासगो सेंटर फॉर व्हायरस रिसर्चचे प्राध्यापक एड हचिन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत ‘सुपर फ्लू’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. “हा आजार बहुतेक रुग्णांसाठी प्राणघातक नसला, तरी त्याचा वेग आणि संसर्गक्षमता चिंताजनक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य यंत्रणा या विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्या तरी सध्या त्याला पूर्णपणे रोखण्यात अपयश येताना दिसत आहे.
नेमकी लक्षणं काय?
‘सुपर फ्लू’ची लक्षणे ही साध्या फ्लूपेक्षा अधिक तीव्र असल्याचे सांगितले जाते. रुग्णांमध्ये अचानक उच्च ताप, तीव्र अंगदुखी, प्रचंड थकवा, डोकेदुखी, कोरडा खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, सतत शिंका येणे अशी लक्षणे एकाच वेळी दिसतात. काही रुग्णांना पोटदुखी, मळमळ, उलटी आणि भूक न लागणे यांचाही त्रास होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोरोनामध्ये लक्षणे हळूहळू वाढत होती, मात्र ‘सुपर फ्लू’मध्ये ही सर्व लक्षणे एकदम तीव्र स्वरूपात जाणवतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, गोंधळल्यासारखे वाटणे, सतत वाढलेला ताप किंवा तीव्र डिहायड्रेशन दिसून येत आहे.
यामुळेच आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशी गंभीर लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, गर्दी टाळावी आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
थोडक्यात काय, कोरोना नंतर पुन्हा एकदा जग नव्या विषाणूच्या सावटाखाली येतंय का, हा प्रश्न आता गंभीरपणे विचारात घ्यावा लागणार आहे. ‘सुपर फ्लू’ हा फक्त हंगामी आजार ठरेल की नव्या महामारीची सुरुवात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.
