![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २२ डिसेंबर २०२५ | डिसेंबरच्या थंडीत बाजारात मात्र चांदीने घाम फोडला आहे! सोनं नेहमीप्रमाणे हळूच, सावरून पुढे सरकत असताना चांदीने थेट धाव घेत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. अवघ्या सात दिवसांत तब्बल १६ हजार रुपयांची झेप घेत चांदीने ‘मी पण आहे’ हे ठामपणे दाखवून दिलं आहे. परिणामी, गुंतवणुकीच्या बाबतीत सोन्याची मक्तेदारी आता चांदी मोडीत काढतेय की काय, असा प्रश्न बाजारात विचारला जाऊ लागला आहे.
देशांतर्गत बाजारात या आठवड्यात सोन्याच्या दरात फार मोठी उसळी पाहायला मिळाली नाही. २४ कॅरेट सोनं केवळ २६० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोनं २५० रुपयांनी महागलं. म्हणजेच सोनं ‘संथ पण सुरक्षित’ या नेहमीच्या भूमिकेत राहिलं. मात्र चांदीने मात्र कुठलाही संयम न पाळता थेट आघाडी घेतली. २१ डिसेंबर रोजी चांदीचा भाव थेट २ लाख १४ हजार रुपये प्रति किलो या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
चालू वर्षाकडे नजर टाकली तर चांदीची कामगिरी अक्षरशः चकित करणारी आहे. आतापर्यंत १२६ टक्क्यांहून अधिक परतावा देत चांदीने अनेक पारंपरिक गुंतवणूक पर्यायांना मागे टाकलं आहे. जागतिक बाजारातही चांदी ६५.८५ डॉलर प्रति औंस या मजबूत पातळीवर व्यवहार करत असून, तिच्या तेजीत सध्या तरी फारशी अडथळ्याची चिन्हं दिसत नाहीत.
ही तेजी नेमकी कुठून आली? यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा वाटा आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी आगामी काळात व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित पर्यायांकडे वळले आहेत. त्यातच अमेरिकेतील कामगार बाजाराची कमकुवत आकडेवारी समोर आल्याने डॉलरवर दबाव आला आणि त्याचा थेट फायदा सोन्या-चांदीला झाला.
याशिवाय जागतिक स्तरावर सुरू असलेले भू-राजकीय तणाव, आर्थिक अस्थिरता आणि शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे ‘सेफ हेवन’ म्हणून मौल्यवान धातूंना मागणी वाढताना दिसतेय. या सगळ्यात चांदीने सोन्याच्या सावलीतून बाहेर येत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
थोडक्यात काय, आतापर्यंत “सोनं म्हणजेच गुंतवणूक” असं समीकरण मानणाऱ्यांना चांदी आता डोळे उघडायला लावत आहे. चकाकणं फक्त सोन्यालाच जमतं, हा समज मोडीत काढत चांदीने बाजारात आपली चकाकी ठळकपणे दाखवली आहे!
