✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २२ डिसेंबर २०२५ | “फोन आपल्या हातात, पण नियंत्रण दुसऱ्याच्याच हातात!” अशी भीषण परिस्थिती सध्या लाखो व्हॉट्सअॅप युजर्ससमोर उभी राहिली आहे. भारतीय सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी गंभीर इशारा जारी केला असून, ‘घोस्ट पेअरिंग’ नावाच्या नव्या हायजॅक पद्धतीमुळे अकाऊंट पूर्णपणे हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यासाठी ना ओटीपीची गरज, ना सिम स्वॅप… तरीही हॅकर तुमच्या अकाऊंटचा मालक बनतो!
व्हॉट्सअॅपच्या ‘डिव्हाइस लिंकिंग’ या सोयीचा गैरफायदा घेत हॅकर्स तुमच्याच नकळत आपलं डिव्हाइस अकाऊंटशी जोडतात. एकदा हे ‘अदृश्य पेअरिंग’ झालं की, हॅकर तुमचे मेसेज वाचतो, फोटो-व्हिडीओ पाहतो, व्हॉइस नोट्स ऐकतो आणि कळस म्हणजे—तुमच्या नावाने इतरांना मेसेजही पाठवतो. तुम्ही आरामात ‘गुड मॉर्निंग’ पाठवत असताना, बॅकग्राऊंडमध्ये कुणीतरी तुमचं डिजिटल आयुष्य उघड्या वहीसारखं चाळत असतं!
CERT-In च्या मते, हा हल्ला अत्यंत धोकादायक आहे कारण युजरला याची साधी कल्पनाही येत नाही. कोणताही अलर्ट नाही, ओटीपी नाही, अचानक लॉगआऊट नाही—सगळं काही शांतपणे घडतं. ही पद्धत सर्वप्रथम चेकियामध्ये समोर आली, पण हॅक झालेल्या अकाऊंट्सच्या साखळीमुळे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावर व्हॉट्सअॅपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, ही बाबही चिंताजनक आहे.
आज व्हॉट्सअॅप म्हणजे केवळ चॅट अॅप नाही, तर बँकिंग अलर्ट, वैयक्तिक फोटो, ऑफिसची माहिती, कौटुंबिक गप्पा—सगळंच त्यात साठलेलं आहे. अशा वेळी ‘घोस्ट पेअरिंग’ म्हणजे डिजिटल घरात चोर बसवण्यासारखाच प्रकार!
मात्र, सावध राहिलं तर धोका टाळता येतो. CERT-In ने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ओळखीच्या नंबरवरून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक असल्याचा दावा करणाऱ्या बाह्य वेबसाइटवर फोन नंबर टाकण्याची चूक करू नका. अॅपमधील Linked Devices हा पर्याय नियमित तपासा आणि ओळख न पटणारे डिव्हाइस तात्काळ लॉगआऊट करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवा—हेच सध्या तुमचं सर्वात मजबूत डिजिटल कुलूप आहे.
थोडक्यात, आजकाल चोर दार उघडून येत नाही, तर सॉफ्टवेअरमधून शिरतो. त्यामुळे ‘मी काहीच केलं नाही’ हा दिलासा आता धोकादायक ठरू शकतो. जागरूक राहा, नाहीतर व्हॉट्सअॅप तुमचं… पण कंट्रोल कुणाचं?
