WTC 2027 Final : किवींची मुसंडी, भारताची कसोटी! WTC फायनलचं दार जवळपास बंद

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २२ डिसेंबर २०२५ | जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५–२७ (WTC) च्या शर्यतीत भारतीय संघासाठी आजचा दिवस ‘हिशेब बिघडवणारा’ ठरला. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या कसोटीत ३२३ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका २–० अशी खिशात घातली आणि त्याचबरोबर पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आपली पकड लोखंडी केली. या विजयाचा सर्वात मोठा फटका बसला तो—टीम इंडियाला. कारण, भारताचा WTC फायनलचा मार्ग आता जवळजवळ काटेरी नव्हे, तर बंदिस्त वाटू लागला आहे.

न्यूझीलंडने या सामन्यात वेस्ट इंडिजला अक्षरशः धडे दिले. पहिल्या डावात ८ बाद ५७५ धावा करत किवींनी विजयाची पायाभरणी केली. डेव्हॉन कॉनवे (२२७) आणि टॉम लॅथम (१३७) या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३२३ धावांची विक्रमी भागीदारी करत विंडीजच्या गोलंदाजांचा संयमच संपवला. रचीन रवींद्रने ७२ धावांचे उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ४२० धावांपर्यंत मजल मारली, पण ती अपुरी ठरली.

दुसऱ्या डावातही न्यूझीलंडने ‘आम्ही इथेच आहोत’ हे ठसवले. लॅथम (१०१) आणि कॉनवे (१००) यांनी पुन्हा शतकं झळकावत २ बाद ३०६ धावांवर डाव घोषित केला. ४६२ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १३८ धावांत गारद झाला. जेकब डफीने ५ विकेट्स घेतल्या, तर अजाझ पटेलने ३ बळी टिपले. थोडक्यात, सामना एकतर्फी, निकाल ठाम!

या निकालानंतर WTC पॉइंट टेबलचं चित्र स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलिया १०० टक्क्यांसह अव्वल, न्यूझीलंड ७७.७८ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर घट्ट बसला आहे. दक्षिण आफ्रिका (७५%) शर्यतीत आहे, श्रीलंका (६६.६७%) आणि पाकिस्तान (५०%) यांनाही अजून आशा आहे. मात्र भारताचा ४८.१५ टक्क्यांचा गुणांक पाहता फायनलची शक्यता गणितापुरती उरली आहे.

हो, गणित अजून जिवंत आहे—भारताला उरलेल्या ९ कसोटींपैकी ८ जिंकाव्या लागतील. त्यातल्या ५ कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर आहेत. पण WTCचं आजचं चित्र पाहता, ही लढाई आता कौशल्याइतकीच नशिबावरही अवलंबून आहे. किवी आणि कांगारूंनी आघाडी घेतलीय; भारताला आता प्रत्येक सामन्यात ‘करो या मरो’चाच मंत्र जपावा लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *