![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २२ डिसेंबर २०२५ | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुणी सहलीचे बेत आखतंय, कुणी गावी जाण्याची लगबग करतंय, तर कुणी एसी कोचमध्ये आरामदायी प्रवासाचं स्वप्न पाहतंय. पण या सगळ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एकदम ‘तिकिटावरची कात्री’ चालवली आहे. येत्या २६ डिसेंबर २०२५ पासून रेल्वे भाडेवाढ लागू होणार असून, लांब पल्ल्याचा प्रवास आणि एसी कोचचा आराम आता थोडा अधिक महागणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर १ ते २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. ऐकायला किरकोळ वाटणारी ही वाढ, मात्र लांबच्या प्रवासात खिशाला चांगलाच चटका देणारी ठरणार आहे. विशेषतः मेल, एक्स्प्रेस आणि एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांना या दरवाढीचा थेट फटका बसणार आहे.
कोणाला किती झटका?
रेल्वेच्या पत्रकानुसार,
एसी कोच (AC) मधून प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वाधिक म्हणजे २ पैसे प्रति किलोमीटर दरवाढ करण्यात आली आहे.
मेल आणि एक्स्प्रेस (नॉन-एसी, स्लीपर) श्रेणीसाठी १ पैसा प्रति किलोमीटर भाडेवाढ लागू होणार आहे.
सर्वसाधारण (जनरल) प्रवाशांसाठी मात्र पहिल्या २१५ किमीपर्यंत भाडे जैसे थे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या आणि ग्रामीण प्रवासावर फारसा परिणाम होणार नाही.
मुंबईकरांना दिलासा
या भाडेवाढीच्या निर्णयात एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबईची लोकल रेल्वे पूर्णपणे वगळण्यात आली आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या तिकिटांमध्ये किंवा मासिक सीझन पासमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
भाडेवाढ का गरजेची?
रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की, गेल्या दहा वर्षांत रेल्वे मार्गांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असून, सध्या मनुष्यबळावरच सुमारे १.१५ लाख कोटी रुपयांचा खर्च होत आहे. पेन्शन, देखभाल खर्च आणि पायाभूत सुविधांवरील वाढता भार लक्षात घेता भाडेवाढ अपरिहार्य होती, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. या वाढीमधून ३१ मार्च २०२६ पर्यंत सुमारे ६०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांचा सवाल
भाडेवाढ जाहीर होताच प्रवाशांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. “सुविधा वाढत असतील तर भाडेवाढ समजू शकते, पण सामान्य प्रवाशांचा विचार झाला का?” असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहेत. नवीन वर्षाच्या तोंडावर आलेली ही भाडेवाढ प्रवाशांसाठी आनंदापेक्षा **‘झटका’**च ठरणार, यात शंका नाही.
