भंडाऱ्याचा जल्लोष अन् आगीचा थरार! जेजुरीत विजयसोहळ्याला काळी किनार

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २२ डिसेंबर २०२५ | विजयाचा आनंद, ढोल-ताशांचा गजर, ‘जय मल्हार’च्या घोषणा आणि त्यात उधळलेला भंडारा… पण जेजुरीत हा जल्लोष काही क्षणातच थरारात बदलला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा उत्सव साजरा करताना जेजुरी गडाच्या कमानीजवळ अचानक आगीचा भडका उडाला आणि आनंदाच्या क्षणांवर भीतीची छाया पसरली. या घटनेत नगरसेवकांसह तब्बल १६ ते १७ जण भाजल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले आणि महायुतीने राज्यभरात विजयाचा झेंडा रोवला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातही याच विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. निवडणुकीत विजयी ठरलेले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक जेजुरी गडावर दर्शनासाठी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. गडाच्या पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणच्या कमानीवर उभे राहून समर्थकांनी विजयी उमेदवारांवर भंडारा उधळण्यास सुरुवात केली.

याचदरम्यान खाली उभ्या असलेल्या गर्दीतून काही महिला कार्यकर्त्या नगरसेवकांचे औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन पुढे आल्या. आरती सुरू असतानाच वरून कोसळणाऱ्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला. आरतीच्या ज्योतीचा संपर्क होताच भंडाऱ्याने आगीचा भडका उडवला आणि काही क्षणांतच एकच गोंधळ उडाला. लोक इकडे-तिकडे पळू लागले, कपड्यांना आग लागल्याने काही जण भाजले.

या आगीच्या घटनेत सुमारे १६ ते १७ जणांना भाजल्याची चर्चा असून, त्यामध्ये नगरसेवकांचे काही सहकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचार देण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, नेमकी आग कशामुळे लागली? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. काही नागरिकांनी भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच ही आग लागल्याचा दावा केला आहे. खऱ्या हळदीऐवजी रसायनांचा वापर केलेल्या भंडाऱ्यात ज्वलनशील घटक अधिक असतात. त्यामुळेच आरतीच्या आगीच्या संपर्कात येताच भंडाऱ्याने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही कार्यकर्त्यांच्या अंगावर आधीपासूनच गुलाल असल्याने त्यातील रसायनांमुळे आगीचा दाह अधिक वाढल्याचा दावाही करण्यात येतोय.

हा सारा थरारक प्रकार जल्लोषाचा व्हिडीओ शूट करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विजयाचा आनंद क्षणातच संकटात बदलू शकतो, याची ही घटना पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *