‘पॅन’-‘आधार’ न जोडल्यास दंड, आता उरले फक्त 28 दिवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला असून, पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी केवळ २८ दिवसांचाच कालावधी उरला आहे. या कालावधीत दोन्ही कार्डे एकमेकांना न जोडल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार असल्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने यापूर्वीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने नवी अधिसूचना जारी करून दोन्ही दस्तावेज जोडण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण न झाल्यास प्राप्तिकर कायद्यांतर्गत संबंधितांवर कडक कारवाईचा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

कर विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२०नंतर कोणीही निष्क्रिय अथवा रद्द झालेल्या पॅन कार्डचा वापर केल्यास संबंधितांकडून ‘प्राप्तिकर कायदा कलम २७२बी’ अन्वये १०,००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारीला जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार ३१मार्चपर्यंत करदात्यांनी पॅन आणि आधार कार्ड न जोडल्यास त्या करदात्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे. पॅन कार्ड रद्द झाल्यास अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे. संबंधितांना बँकिंग व्यवहारांवर पाणी सोडावे लागणार असून, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीत अडथळे येण्याचीही शक्यता आहे. याशिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येणार नसल्याने गुंतवणूकदारांची मोठी पंचाईत होणार आहे. पॅन आणि आधार कार्ड न जोडल्यास हे दस्तावेज जवळ असूनही त्यांचा वापर आवश्यक त्या कामांसाठी करता येणार नाही.

वेळोवेळी मुदतवाढ

पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्याची मुदत वारंवार गरजेनुसार वाढवण्यात आली आहे. मात्र, ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राप्तिकर खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ जानेवारी २०२० पर्यंत ३०.७५ कोटी पॅन कार्डे आधार कार्डांशी जोडण्यात आली आहेत. अद्याप १७.५८ कोटी पॅन कार्ड १२ अंकी आधार कार्डशी जोडणे बाकी आहेत.

…तर भरावा लागणार दंड

करदात्यांच्या सोयीसाठी कर विभागाने पॅन कार्डाच्या ऐवजी १२ अंकी आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आधार कार्डाचा उपयोग करताना योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही कारणास्तव चुकीचा आधार कार्ड क्रमांक दिल्यास संबंधिताला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *