पुणेकरांना दिलासा ; मॉल, दुकानं आणि हॉटेल्सची वेळ वाढवली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । दिवाळीच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील मॉल, दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिवाळीची खरेदी रात्री 11 पर्यंत करता येईल. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय, 22 ऑक्टोबर पासून अँम्युझमेंट पार्क आणि संग्रहालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुण्यात काल (बुधवार) दिवसभरात 112 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, काल दिवसभरात 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातही कोरोनाच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्यात सध्या 151 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 469 पर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 988 वर पोहोचली आहे. पुण्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 9067 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 493414 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज 5986 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुण्याला देखील बसला होता. पुण्यामध्ये कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढली होती. पुण्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यानंतर रुग्णांच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्याला 6 फेब्रुवारी 2021 नंतर दिलासा मिळाला आहे.

पुण्यात ‘लसीकरण आपल्या दारी’ अभिनव उपक्रम
पुणे शहरात 108 टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नसते, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

महापौर मोहोळांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात ज्या शहरांत सर्वाधिक कोरोनावाढ झाली, त्या शहरांपैकी पुण्याचं नाव सर्वांत अग्रभागी घ्यावं लागेल. तसंच पुण्यात कोरोनाची मृत्यूसंख्याही बरीच होती. हीच रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने जीवाचं रान केलं. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेरांनीही भक्कम साथ दिली. आज समस्त पुणेकरांच्या साथीला आणि महापाालिकेच्या प्रयत्नांना यश आलंय. 6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच पुण्यात काल कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. असं असलं तरी महापौरांनी याचं सर्व श्रेय पुणेकरांना दिलंय. त्यांनी श्रेयासाठी कोणताही हक्क सांगितलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *