महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । देशात इंधन दरवाढीचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी सलग दुसऱ्य़ा दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. दोन्ही इंधन प्रतिलिटर 35 पैशांनी महाग झाले. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोल 112 रुपये 44 पैसे, तर डिझेल 103 रुपये 26 पैशांवर गेले आहे. दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचा भाव अनुक्रमे 106 रुपये 54 पैसे आणि 95 रुपये 27 पैशांवर पोहोचला आहे.
ऑक्टोबर महिन्यातील 20 दिवसांतच इंधनांच्या किमतीत विक्रमी 5 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा दरवाढ जाहीर करून सर्वसामान्यांच्या चिंतेत मोठी भर टाकली. इंधन दरवाढीचा हा भडका कधी शमणार, असा सवाल जनतेतून केंद्रातील मोदी सरकारला विचारला जात आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरल 90 डॉलरवर पोहोचेल. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दराचा आणखी भडका उडून जनतेला महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे.सप्टेंबरच्या अखेरीस तीन आठवड्यांचे सुधारित दर जाहीर करण्यात आले. तेव्हापासून पेट्रोलची 18 वेळा आणि डिझेलची 21 वेळा दरवाढ झाली आहे. या कालावधीत पेट्रोल 5 रुपये 35 पैशांनी तर डिझेल 6 रुपये 85 पैशांनी महागले आहे.
याआधी मे ते जुलैदरम्यान इंधन दरवाढीचा असाच भडका उडाला होता. 4 मे ते 17 जुलैदरम्यान पेट्रोलच्या किमतीत तब्बल 11 रुपये 44 पैशांची वाढ झाली, तर याच कालावधीत डिझेल 9 रुपये 14 पैशांनी महागले आहे. या वर्षात आतापर्यंत पेट्रोल 22 रुपये 57 पैशांनी आणि डिझेल 21 रुपये 15 पैशांनी महाग झाले आहे.अनेक राज्यांत पेट्रोलने आधीच शंभरी ओलांडली आहे. तसेच जवळपास अर्धा डझन राज्यांत डिझेलनेही शंभरीचा टप्पा पार केला आहे. या इंधन दरवाढीच्या भडक्याने दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या किमती वाढून सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे.