T20 World Cup: ऐतिहासिक विजयानंतर मैदानातच रडू लागले बाबर आझमचे वडील, पहा व्हिडीओ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला पराभूत न करु शकणाऱ्या पाकिस्तानसाठी हा विजय खास होता. या विजयानंतर बाबर आझमच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले होते.

विजयानंतर मैदानात पाकिस्तानी नागरिकांचा जल्लोष सुरु असताना त्यामध्ये बाबर आझमचे वडीलदेखील होते. विजयानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांना त्यांना घेरलं आणि अभिनंदन करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या या ऐतिहासिक विजयामुळे बाबरचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांना आपले अश्रून आवरत नव्हते.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावाच करता आल्या. रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. त्यामुळे भारताला जेमतेम १५० धावांचा टप्पा पार करता आला.

कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत अखेरची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. यापूर्वी भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाचही विजय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. २०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत भारताला कोहलीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आताच्या पराभवामुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावरही चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी भारताने दोन्ही विश्वचषकात पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले होते. भारताने त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात सात (१९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५, २०१९) आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाच (२००७मध्ये दोन वेळा, २०१२, २०१४, २०१६) सामने जिंकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *