महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑक्टोबर । अनेकदा साध्या दिसणाऱ्या घटनांमधून काय निघेल ते सांगता येत नाही. काही मच्छिमारांच्या बाबतीत अगदी अशीच घटना घडली आहे. काही मच्छिमारांना नदीत कोट्यवधींचा खजिना सापडला आहे. ही घटना इंडोनेशियाच्या सुमात्रा द्वीपावरची आहे. येथील मुसी नावाची नदी मगरींच्या वावरासाठी कुप्रसिद्ध आहे. पण, याच नदीच्या पात्रात मच्छिमारांना 8व्या शतकातील दुर्मीळ ऐवज सापडला आहे.
त्यात दुर्मीळ रत्ने, सोन्याच्या अंगठ्या, नाणी, मूर्ती आणि बौद्ध भिक्खुंकडील कांस्याच्या घंट्या मिळाल्या आहेत. यात 8व्या शतकातील पुरुषउंचीची भगवान बुद्धांची दागिन्यांनी मढलेली मूर्ती देखील मिळाली आहे. त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
हा खजिना आणि यातील ऐवज हा श्रीविजय राजसत्तेच्या काळातील आहेत. श्रीविजय साम्राज्य हे सातव्या ते 13व्या शतकापर्यंत एक वैभवशाली साम्राज्य होतं. सोन्याच्या खजिन्यासाठी प्रसिद्ध असणारं हे साम्राज्य अचानक रहस्यमयरित्या गायब झालं होतं.
या गायब झालेल्या साम्राज्यात पालेमबांग नावाच्या एका द्वीपाचाही समावेश आहे. या बेटाला श्रीविजय राजसत्तेचा सुवर्णद्वीप मानलं जायचं. या राजसत्तेच्या खजिन्याचा शोध खूप लोकांनी घेतला होता. आता तब्बल 700 वर्षांनी त्या खजिन्याचा शोध लागला आहे.