महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । देशात अनेक राज्यांमध्ये (States) डेंग्यूच्या (Dengue) आजाराने कहर माजवला आहे. दिल्ली-एनसीआरपासून (Delhi-NCR) उत्तर प्रदेश आणि राजस्थानपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूसह मलेरिया आणि चिकनगुनियाचाही उद्रेक सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांपासून (Mosquito) सावध राहावं, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आजतकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
डेंग्यू हा विषाणूजन्य (Viral) आजार असून त्याचा फैलाव डासांमुळे होतो. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याला असा संक्रमित होत नाही. या विषाणूची लागण झालेले एडिस जातीचे (Edis Mosquito) डास माणसाला चावल्याने डेंग्यू होतो. डेंग्यूच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे ते सेरोटाइप आहेत. त्याचे चार प्रकार असून या चारही जातींच्या विषाणूपासून वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज (Antibodies) तयार होतात.
या चार वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंपासून माणसाला चार वेळा डेंग्यूची लागण होऊ शकते. DEN-1, DEN-2, DEN-3 आणि DEN-4 अशा चार प्रकारचे हे विषाणू आहेत. डेंग्यूच्या डासांचेही (Dengue Mosquito) एक वैशिष्ट्य आहे.
डेंग्यूचे डास बहुतेक वेळा दुपारी चावतात (Bite Time). विशेषतः सूर्योदयानंतर दोन तास आणि सूर्यास्तापूर्वी एक तास या वेळेत हे डास अधिक सक्रिय असतात. जिथं कृत्रिम प्रकाशाचा अधिक वापर असतो अशा ठिकाणी डेंग्यूचे डास रात्रीच्या वेळीही सक्रिय असतात. त्यामुळे मॉल, इनडोअर ऑडिटोरियम, स्टेडियममध्ये डेंग्यूचे डास चावण्याचा धोका अधिक असतो.
डेंग्यूचे डास चावल्यानंतर चार ते सहा दिवसांनी डेंग्यूची लक्षणं (Symptoms) दिसू लागतात. दहा दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसतात.
ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, थकवा, उलट्या होणं, त्वचेवर लाल चट्टे, नाकातून, हिरड्यांमधून रक्त येणं अशी लक्षणं दिसतात. प्लेटलेट्स कमी होतात. काहीवेळा अगदी सौम्य लक्षणं असल्यानं फ्लू किंवा व्हायरल इन्फेक्शन समजलं जातं.
काय आहे उपचार?
डेंग्यूवर काही विशिष्ट उपचार नाहीत. भरपूर आराम करणे, प्लेटलेट्सची (Platelets) तपासणी नियमितपणे करून त्या आवश्यक मर्यादेत राहतील यासाठी पूरक आहार घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी तसंच अन्य पातळ पदार्थ घेणे. शहाळ्याचे पाणी, पपई , किवी, डाळींब, बीट तसंच हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. यामुळे प्लेटलेट्स वाढण्यासाठी मदत होते. प्लेटलेट्स खूपच कमी झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतील.
डेंग्यूपासून वाचण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डेंग्यूचा डासापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे. याकरता शरीराचा कोणताही भाग उघडा राहणार नाही असे कपडे घालणे, रात्री झोपताना मच्छरदाणी लावून झोपणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घरात, घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यासाठी कुठेही पाणी साठू न देणे महत्त्वाचं आहे. झाडांच्या कुंड्यांखाली, कूलरमध्ये, जुन्या टायर्समध्ये पाणी साठलं असेल तर ते काढून टाकणे गरजेचं आहे.