हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ११२ कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. त्यानुसार तातडीने निधी वितरित केल्याने राज्यात हजारो एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एस.टी. कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्वांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे.

कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी ११२ कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी झाली.

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना २,८६० कोटीची मदत
ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी २,८६० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *