महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण अन्य पर्यायांच्या शोधात आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात इलेक्ट्रीक कार्सनाही मोठी पसंती मिळत आहे. मुंबईतील स्टार्टअप कंपनी Storm Motors नं आपली मिनी इलेक्ट्रीक कार Strom R3 च्या बुकींगला सुरूवात केली आहे. या कारच्या बुकींसाठी केवळ 10 हजार रूपये बुकींग अमाऊंट म्हणून भरावे लागणार आहेत. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचंही म्हटलं जात आहे.
Strom R3 ही दोन दरवाजे असलेली आणि तीन चाकी कार आहे. या कारमध्ये पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला एक चाक आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुर अशा शहरांकडे लक्ष देत ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीनं मस्क्युलर लूकसह यात LED लाईट्स, ड्युअल टोन आणि सनरूफही दिलं आहे. या कारची लांबी 2,907mm, रूंदी 1,405mm आणि उंची 1,572mm असून यात 185mm चा ग्राऊंड क्लिअरन्सही देण्यात आला आहे. या कारचं एकूण वजन 550 किलो असून यामध्ये 13 इंचाचे स्टील व्हिल्स देण्यात आले आहेत. ही कार दिसण्यातही आकर्षक वाटते.
बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज
Strom R3 मध्ये कंपनीने 13 kW क्षमतेच्या हाय एफिशिअन्सी मोटरचा प्रयोग केला आहे. जो 48Nm चा टॉर्क जनरेट करतो. याव्यतिरिक्त यासोबत एक फास्ट चार्जर देण्यात आला असून याच्या मदतीनं कार केवळ 2 तासांमध्ये 80 टक्के चार्ज होते. या कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. तसंच घरातील 15 अॅम्पिअर क्षमतेच्या घरातील सॉकेटमधूनही ही कार चार्ज करता येऊ शकते.
एका चार्जमध्ये ही कार 200 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. ही कार चालवण्याचा खर्च 40 पैसे प्रति किलोमीटर आहे. ही कार तीन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात येईल. त्यानुसार त्यांची ड्रायव्हिंग रेंजही बदलेल. यामध्ये 120 किमी, 160 किमी आणि 200 किमी अशी ड्रायव्हिंग रेंज आहे. Strom R3 तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यात इलेक्ट्रिर ब्ल्यू, नियॉन ब्ल्यू आणि रेड-ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.
काय आहेत फीचर्स
दिसण्यात जरी ही कार छोटी असली तरी यात अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, 4.3 इंचाचा इन्स्ट्रूमेंट कन्सोल, क्लायमेट कंट्रोल, रिमोट किलेस एन्ट्री, 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, IOT अनेबल्ड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम, 4G कनेक्टिव्हीटी आणि व्हॉईस कंट्रोल असे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत.