महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 मध्ये प्रत्येक टीमच्या सुरुवातीच्या काही मॅच झाल्या आहेत. अर्ध्याहून अधिक स्पर्धा शिल्लक असतानाही इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने यंदाच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup Final) कोण खेळेल, याची भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात या टी-20 वर्ल्ड कपची फायनल होऊ शकते, असं बेन स्टोक्स म्हणाला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर रोमांचक विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्सने ट्वीट केलं. यात त्याने इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनल??? असा प्रश्न विचारला.
सुपर-12 स्टेजमध्ये सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून पाकिस्तानने सेमी फायनलमधला आपला प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्तानच्या उरलेल्या दोन मॅच आता नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध आहेत. या दोन्ही टीम दुबळ्या असल्यामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडची टीमही पहिल्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही टीमनी आतापर्यंत एक-एक वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2009 साली पाकिस्तानने तर 2010 साली इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.