कोरोना – भारतीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही – कोरोनाची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – मुंबई :
सध्या जगभरात कोरोनाची दहशत पसरत आहे. मात्र यामुळे आपण भारतीयांनी लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. भारतातही परदेशातून आलेल्या पर्यटक आणि प्रवासी भारतीयांच्यामार्फत कोरोनाचे आगमन झाले आहे. सरकारी यंत्रणा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी कार्यरत आहेत. कोरोना अर्थात कोविड१९ (COVID19) या विषाणूवर प्रभावी लस अजूनही तयार करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती नाही. यावर लस तयार करण्याचा प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळेच विद्यमान परिस्थितीत कोरोनाची लागणच होऊ नये यासाठी काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते.

केरळ, तेलंगाणा, कर्नाटक, दिल्लीमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आल्याची माहिती सध्या आहे. दिल्लीसह तेलंगणामधेही इटलीहून आलेल्या एका प्रवाशाला कोरोना झाल्याचं समोर आलंय. याआधी केरळमधे कोरोनाचे तीन रुग्ण सापडले होते. बर्फाळ प्रदेश वगळता जगभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिसत आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण चीनमधून झाली असली तरी आता त्याची लागण जगभरात होत असल्याने खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. भारतातही कोरोनाने पाऊल ठेवले आहे. त्यातच मुंबईमध्ये कोरोनाचा संशयित आढळल्याने आपणही काळजी घेतली पाहिजे. कोरोनाग्रस्ताचा संपर्क टाळणे तसेच कोरोनाग्रस्ताने इतरांचा संपर्क टाळणे यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत कालच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच संबंधित विद्यार्थ्यांची वेगळी सोय करण्यात आली होती.

खबरदारीचे उपाय
►हात साबण लावून पाण्याने नियमित स्वच्छ धुवा.
►टिश्यूपेपर वापरल्यावर तात्काळ झाकलेल्या कचरापेटीत टाका.
►डोळे, नाक आणि तोंडाला हात लावणे टाळा.
►खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका
►रुमाल नसेल तर हात तोंडावर ठेवा किंवा कोपरातील खोबणीत शिंका
►सर्दी, खोकला, ताप असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा
►डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा
►सार्वजनिक वाहनाने प्रवासात आजारी असाल तर मास्क लावा
►आजारपणाची माहिती विमान, रेल्वे किंवा बसमधल्या स्टाफला द्या
►प्रवासाला निघण्याआधीच योग्य औषधे घ्या
►खोकला, तापाची लक्षणे असलेल्या माणसांच्या संपर्कात येणे टाळा
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
►कच्चे, नीट न शिजलेले मांस खाणे टाळा
►जनावरांचा बाजार, कत्तलखान्यांमधे जाणे टाळा
►खबरदारी म्हणून मास्कचा वापर करावा
►कोरोनापासून संरक्षणासाठी साधा मास्कही पुरेसा आहे
►मास्क एकदा वापरल्यानंतर तो बंद कचरापेटीतच टाका
►कोरोनाबाधिताच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरावा
►सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे असतील तर मास्क वापरा

केंद्रसरकारची हेल्पलाईन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोवल कोरोना व्हायरसपासून बचावासाठी काही सूचना केल्यात. केंद्र सरकारने एक हेल्पलाईन नंबरही सुरू केला आहे. +९१-११-२३९७८०४६ हा नंबर चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आलाय. तसेच अधिकच्या माहितीसाठी आपण ncov2019@gmail.com या ईमेलवरही संपर्क साधू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *