महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ नोव्हेबर । पिंपरी । राज्य शासनाच्या आदेशानुसार १० दिवसांपूर्वीच नाटय़गृहे सुरू करण्यात आली. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील नाटय़गृहे खुली करण्यात आली. मात्र, पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आजपर्यंत नाटय़गृहासाठी कुशल, पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वाचीच गैरसोय होत आहे.
जवळपास दीड वर्षे (मधला ठरावीक काळ वगळता) नाटय़गृहे बंद होती. २२ ऑक्टोबरपासून नाटय़गृहे सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यानुसार, महापालिकेने नाटय़संस्था तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाटय़गृहे खुली केली. मात्र, करोना पूर्व काळात नाटय़गृहात असलेले कुशल कर्मचारी (नाटय़गृहातील कामकाजाची व्यवस्थित माहिती असणारे) आरोग्यविषयक कामांसाठी पाठवण्यात आले होते. नंतरच्या काळात लसीकरणाशी संबंधित कामांसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली.
नाटय़गृहे सुरू करत असताना त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मूळ जागी आणणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने अनेक समस्या जाणवत आहेत. सध्या नाटय़गृहांमध्ये अतिशय अपुरा कर्मचारी वर्ग आहे. या प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक अधिकाऱ्यांपासून ते आयुक्तांपर्यंत अनेकांकडे करण्यात आली. महापौर माई ढोरे यांनीही चार दिवसांपूर्वी प्रशासनातील अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. तरीही त्याविषयी कार्यवाही झाली नाही. या प्रकरणी टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते.
परवानगीनंतर नाटय़गृहातील कार्यक्रम पुन्हा सुरू झाले आहेत. बुधवारपासून दिवाळी पहाटचे कार्यक्रम होणार आहेत. मात्र, कर्मचारीच नसल्याने आयोजकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत अशीच परिस्थिती होती.
नाटय़गृहात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, याविषयीची माहिती प्राप्त झाली आहे. लवकरच ते उपलब्ध करून दिले जातील.
– राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी पालिका.