महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । मोदी सरकारने दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर इंधनावरील करात कपात करुन नागरिकांना दिवाळीचं एक गिफ्टच दिलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये पाच रुपयांची तर डिझेलवरील व्हॅटमध्ये 10 रुपयांची कपात केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त (Petrol – Diesel price reduce) झाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील अनेक राज्यांनी सुद्धा करात कपात करुन नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकार (Thackeray Government) इंधनावरील व्हॅट कपात करुन महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचं गिफ्ट देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला एक मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना आपणही करात कपात करावी असे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारने इंधनावरील व्हॅट कपात केल्यावर इतरही राज्यांनी करात कपात करण्याचा निर्णय घेत नागरिकांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. यामध्ये गुजरात, उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, त्रिपूरा, आसाम या राज्यांचा समावेश आहे. तर हिमाचल प्रदेश सरकारने व्हॅट कपात करण्याच्या संदर्भात लवकरच नोटिफिकेशन काढणार असल्याचं म्हटलं आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये सात रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आसाममध्ये पेट्रोल-डिझेल सात रुपयांनी स्वस्त झालं आहे.