Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन-खाद्यप्रक्रिया क्लस्टरचा बिगुल! भोसरी-हडपसरमध्ये राज्यातील पहिलाच उपक्रम; २०० उद्योजकांना थेट दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १६ फेब्रुवारी २०२६ || पुण्याच्या औद्योगिक क्षितिजावर नवा अध्याय सुरू होत आहे. राज्यातील पहिल्या ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया क्लस्टरच्या उभारणीसाठी Maratha Chamber of Commerce, Industries and Agriculture (एमसीसीआयए)ने पुढाकार घेतला असून भोसरी आणि हडपसर येथे हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) अत्याधुनिक सामाईक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया या दोन्ही क्षेत्रांतील उद्योगांना संशोधन, चाचणी, डिझाईन, प्रारूप निर्मिती आणि बाजारपेठेत प्रवेशापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच छताखाली मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० ते २०० उद्योगांना थेट लाभ होणार असून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.

ड्रोन क्लस्टर भोसरी औद्योगिक वसाहतीतील एमसीसीआयएच्या शाखेत उभारण्यात येणार आहे. संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि वाहतूक या क्षेत्रांत ड्रोनचा वाढता वापर लक्षात घेता डिझाईन, संशोधन व चाचणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सुविधा येथे उपलब्ध होतील. तर हडपसर येथे उभारण्यात येणारे खाद्यप्रक्रिया क्लस्टर कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी एकात्मिक सुविधा केंद्र असेल. गुणवत्ता तपासणी, निर्यातीसाठी प्राथमिक चाचणी, ब्रँडिंग व तांत्रिक सल्ला यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप्स आणि लघुउद्योजकांना मोठा आधार मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे ‘सीईटीपी’ प्रकल्पही अधिक सक्षम पायाभूत सुविधांसह स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हा उपक्रम एमएसएमई-सीडीपी योजनेअंतर्गत राबवला जाणार असून सुमारे ३० कोटी रुपयांच्या प्रकल्पात केंद्र आणि राज्य शासनाचा एकत्रित वाटा किमान ७० टक्के असेल. मंजुरी, निधी वितरण, यंत्रसामग्री खरेदी आणि तज्ज्ञांची नियुक्ती असे टप्पे पूर्ण करून मार्च २०२७ अखेर दोन्ही क्लस्टर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला १२ ते १५ प्रवर्तक उद्योजक सहभागी होणार असून पुढील काळात २००हून अधिक उद्योग या सुविधांचा लाभ घेऊ शकतील. भविष्यातील तंत्रज्ञान आणि अन्नसुरक्षेच्या गरजा ओळखून उभारला जाणारा हा उपक्रम पुण्याला राज्याच्या औद्योगिक नकाशावर आणखी भक्कम स्थान मिळवून देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *