महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या भिन्न भूमिका आणि भाजपने त्यांची कोंडी करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे संप मिटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांची लढाई न्यायालयातही लढू, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
एसटीतील अनेक संघटना काँग्रेस, भाजप, शिवसेना यांच्याशी संलग्न आहेत. काही संघटनांच्या कृती समितीचा संपास विरोध आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आता राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारची अनेक महामंडळे एसटीप्रमाणे तोट्यात असून जर एसटीच्या ९४ हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेतले, तर अन्य महामंडळांच्या कर्मचाऱ्यांकडून तशी मागणी होईल. एसटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे राज्य सरकारलाही आर्थिक चणचणीमुळे शक्य नाही.
पण भाजपने महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी फूस दिल्याने काही आगारांमध्ये संप सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केल्याने विदर्भात संपाला मोठा प्रतिसाद आहे. मात्र महाविकास आघाडीतील एका पक्षाने संपकऱ्यांना पाठिंबा दिल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली आहे. काही संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्थीची विनंती केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करीत आहेत. पण संपाबाबत अजून तोडगा निघू शकलेला नाही.