महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सुरु होऊन जेमतेम महिना उलटून गेलाय. अशात मुंबई ते सिंधुदुर्ग हवाई प्रवास भलताच महाग झालाय. महिनाभरात तिकीटाचे दर तब्बल चारपट वाढले आहेत. महिनाभरापूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी ज्या विमानाला 2500 रुपये द्यावे लागायचे त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आता तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागतायत.
कोकणातील दोन-तीन पिढ्यांनी विमानतळाचं स्वप्न पाहिलं. 9 ऑक्टोबरला हे स्वप्न सत्यात उतरलं. केंद्रीय विमान वाहतूक उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्य्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचं उद्घाटन मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. उद्घाटन सोहळ्याला जेमतेम महिना उलटून गेलेला असतानाच विमान तिकीटाचे दर तब्बल चार पट वाढले आहेत. त्यामुळे विमान प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या कोकणवासियाची मात्र घोर निराशा झाली आहे.
2500 हजारांचं तिकीट आता 12500 रुपयांना!
चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचं प्रत्येक कोकणवासियाचं स्वप्न होतं. अगदी अडीज तीन हजार खर्च करुन आपण गावी जाऊयात, असं चाकरमनी मोठ्या अभिमानाने सांगत होते. पण आता तीन हजारांचं तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना घ्यावं लागणार आहे. चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिकीट अडीच हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढले!
सिंधुदुर्गतील चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसंही सणासुदीत विमान तिकीटाचे दर वाढतात हे खरंय पण हे दर आणखीनच वाढण्याची शक्यता आता वर्तवली जातीय.
महिनाभरात विमानांची उड्डाणांवर उड्डाणं!
मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरु झाली. म्हणजेच विमानसेवा सुरु होऊन जेमतेम महिना उलटलाय. पण गेल्या महिनाभरात या विमानसेवाला चाकरमन्यांना जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या महिनाभरात विमानाचं तिकीट मिळणं मुश्किल होतं. त्यात दसरा दिवाळीमुळे तर तिकीटांचं बुकिंग अगोदरच झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2500 हजारांवरुन विमान तिकीट आता 12 हजारांवर जाऊन पोहोचलं आहे.