महागाईचा दणका : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाज्या महागल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । Vegetable price hike : महागाईचा भडका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या दरवाढीनंतर आता भाज्यांच्या (Vegetable) दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ताटातून भाज्या गायब होणार आहेत. तसेच कांद्याची किरकोळ बाजारात दरवाढ होताना दिसत आहे. दरम्यान, इंधन दरवाढ, अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका बसला आहे. आवक घटल्याने भाज्या महागल्या आहेत. किरकोळ बाजारात शिमला मिरची, गवार भाज्या शंभरी पार गेल्या आहेत.

इंधन दरवाढ आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक घटली. त्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज भाज्यांच्या 600 ते 700 गाड्या दाखल होतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या गाड्यांच्या संख्येत घट झाली आहे. शिमला मिरची, गवार यांसारख्या भाज्यांनी तर किरकोळ बाजारात शंभरी पार केली आहे.

कोबी 60 रुपये किलो, शिमला मिरची 120 रुपये किलो, गवार 120 रुपये किलो, कांदे 45 ते 50 रुपये किलो दराने विकले जात आहेत. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कडाडलेत. गेल्या महिन्यात भाज्यांचे दर 20 ते 25 टक्के वाढले होते. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक नष्ट झालेत. तर दुसरीकडे इंधनाचे दर ही गगनाला भिडलेत. यासगळ्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे.

मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने पुढील महिनाभर हे दर चढेच राहतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, नवीन भाज्यांची आवक तसेच परराज्यातील भाज्यांची आवक वाढेल त्यावेळी भाज्यांचे दर स्थिर होतील असा अंदाज एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *