![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ नोव्हेबर । यंदाच्या कार्तिकी एकादशीला पंढरीत भाविकांची मांदियाळी, टाळ मृदंगाचा जयघोष तर हरिनामाच्या गजराने नगरी पुन्हा एकदा दुमदुमून गेली, यंदा यात्रेला आणि ६५ वर्षांपुढील नागरिकांना सरकारने परवानगी दिली. मात्र एस टी. चा संपामुळे भाविकांची संख्या कमी झाली. त्याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसला. दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेत उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक सहभागी झाले तर नांदेड जिल्ह्यातील टोणगे दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला.
यंदाच्या कार्तिकी यात्रेला राज्य सरकारने आरोग्याचे नियम पाळून यात्रा भरविण्यास परवानगी दिली. तसेच ६५ वर्षां पुढील आणि गरोदर मातांना दर्शनास मुभा दिली. त्यामुळे यंदा कार्तिकी यात्रेला मोठय़ा संख्येने भाविक पंढरीत येतील असा अंदाज होता. प्रशासनाने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी आता यात्रा भरणार म्हणून चांगलीच तयारी केली. मात्र,एस टी.चा संपामुळे भाविक आले तेही खासगी वाहन, रेल्वेने यात्रेला आले. अपेक्षेपेक्षा ५० टक्के भाविक कमी आले.त्यामुळे भरलेला माल शिल्लक राहिला असे येथील छायाचित्र व्यावसायिक सतीश पाठक यांनी सांगितले.
असे असले तरी पंढरीत आलेल्या भाविकांचा उत्साह दिसून आला. शहरातील विविध मठ,धर्मशाळा,चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर, वाळवंट येथे भाविकांचे भजन कीर्तन सुरु होते. मंदिर परिसरात तुरळक का असेना पण गर्दी दिसून आली. यंदा जवळपास दोन लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक केली. तर महापूजेला नांदेड जिल्ह्यातील टोणगे दाम्पत्याला मान मिळाला. एकादशीला सकाळी चंद्रभागा नदीत स्नान, प्रदक्षिणा आणि देवाचे दर्शन असा वारकरी संप्रदायातील एकादशीच नित्यक्रम भाविकांनी पूर्ण केला. दुपारी खासगीवाले यांचा रथोत्सव निघाला. एकंदरीत करोनाचे संकट संपून देवाचे पदस्पर्श दर्शन होऊ दे असे साकडे भाविकांनी आपल्या लाडक्या विठूराया चरणी केले.