महाराष्ट्र 24-पुणे –
मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर शनिवारपर्यंत ७३९ विमानांमधील ९६ हजार ४९३ प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात २४२ जणांना दाखल केले आहे. त्यापैकी २२९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला.
इतर १६ जणांचे अहवाल उद्या मिळणार आहेत. कोरोनाबाधित भागातून राज्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी ३०५ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, नाशिक, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतूनही चीन व इतर बाधित भागांतून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
परदेशातून आलेले नऊ जण ‘नायडू’ रुग्णालयात
दुबई, सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधून प्रवास करून पुण्यात आलेल्या नऊ जणांना कोरोनाच्या संशयावरून महापालिकेच्या नायडू रुग्णालयात शनिवारी दुपारी दाखल केले. तसेच, शुक्रवारी दाखल केलेल्या तीन जणांना घरी सोडले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे नऊ जण दुबई, सौदी अरेबिया आणि इंग्लंड येथून प्रवास करून मागील काही दिवसांत पुण्यात परतले. त्यामध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून, तीन दिवसांपासून त्यांच्यात घसादुखी, खोकला, सर्दी आणि ताप ही लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना पुढील तपासणीसाठी नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांचा तपासणी अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहे.