कण्हेरी येथील 25 एकरांच्या भूखंडावर भव्य शिवसृष्टी साकारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24-पुणे :

तालुक्यातील कण्हेरी येथील 25 एकरांच्या भूखंडावर भव्य शिवसृष्टी साकारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच उभा केला जाणार आहे. स्वतः अजित पवार यांनी या ठिकाणी भेट देत अधिका-यांना अनेक सूचना केल्या. पवार यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सुधीर पानसरे, किशोर मासाळ आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवनेरीवरील महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास दृकश्राव्य माध्यमातून उभा केला जाणार आहे. सर्वात शेवटी महाराजांचा मेघडंबरीतील सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती भव्य पुतळा उभारला जाणार आहे. याशिवाय गड किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार असून, प्रत्येक किल्ल्यावरील इतिहासही दृकश्राव्य माध्यमातून उभा केला जाईल. याचे म्यूरल्स देखील तयार होणार आहे. या शिवसृष्टीला भेट देणा-या पर्यंटकांसमोर महाराजांचा पूर्ण इतिहासच उभा केला जाणार आहे. या जागेशेजारी असलेल्या फळरोपवाटिकेचे रुपांतर कृषी पर्यंटनामध्ये करण्याचे नियोजन असून नियोजित शिवसृष्टीला लागून असलेल्या वनखात्याच्या 175 एकर जमिनीवर ऑक्सिजन गार्डन तयार केले जाणार आहेत. नियोजीत पालखी महामार्गाला ही शिवसृष्टी जोडली जाणार आहे. या ठिकाणी नीरा डावा कालव्यावर एक पूल उभारला जाणार असून, सात बाजुंचे रस्ते शिवसृष्टीला जोडले जातील, अशी माहिती किरण गुजर यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी दहा कोटींची तरतूदही करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी एकूण 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *