रंग खेळताना त्वचा आणि केसांची घ्यावयाची काळजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24-मुंबई –
होळी आणि रंगपंचमी आनंदाने, उत्साहाने भरलेले आणि रंगांनी नटलेले सण आहेत. मात्र हे रंग आपली त्वचा आणि केस यांच्याकरिता नुकसानकारक ठरू शकतात. रंग खेळण्यापूर्वी चमकदार असलेले केस रंग खेळल्यानंतर अतिशय राठ, कोरडे दिसू लागतात. आपली त्वचा देखील कोरडी पडते, क्वचित प्रसंगी त्वचेची आग होऊ लागते. त्वचेवरून रंग हटविल्यानंतरही पुढे किती तरी वेळ त्वचेची आग होणे, त्वचेवर लाली येणे असे प्रकार सुरु राहतात. हे सर्व टाळण्यासाठी रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळून झाल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

रंग खेळण्यापूर्वी आपल्या त्वचेवर सनस्क्रीनचा वापर जरूर करावा. त्यामुळे घराबाहेर उन्हामध्ये रंग खेळताना त्वचा सुरक्षित राहील. सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेवर भरपूर कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेल लावावे. त्यामुळे रंग खेळल्यानंतर त्वचेला येणारा कोरडेपणा येणार नाही, आणि त्वचेवरून रंग सहज उतरेल. जर केस लांब असतील तर केस व्यवथित बांधून घ्यावेत. केसांनाही भरपूर तेल लावावे, म्हणजे त्यातून रंग निघून जाण्यास अडचण होणार नाही. रंग खेळताना शक्यतो एखाद्या दुपट्ट्याने केस झाकावेत. विशेषतः केस कलर केलेले असतील, तर रंग खेळताना केस झाकणे उत्तम. होळीचे रंग खेळण्याच्या दोन तीन दिवस आधी कोणत्याही प्रकारची ब्युटी ट्रीटमेंट घेणे टाळावे.

रंग खेळून झाल्यानंतर जितके कोरडे रंग आपल्या हात-पायांवर किंवा केसांमध्ये असतील, ते झटकून टाकावेत. त्याआधी अंगावर किंवा केसांवर पाणी ओतून घेऊ नये. पाण्यामुळे रंग अजून पसरतील आणि मग सहजी साफ होणार नाहीत. जर तुम्ही कोरड्या रंगांऐवजी ओल्या रंगांचा वापर केला असेल, तर गरम पाण्याने स्नान करणे टाळून, स्नान करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. स्नानासाठी थंड पाण्याचा वापर केल्याने रंग त्वचेतील रंध्रांमध्ये शिरत नाहीत आणि त्वचेवरून लवकर उतरतात.

रंग खेळून झाल्यानंतर केस एखाद्या चांगल्या प्रतीच्या सौम्य शँपूने धुवावेत आणि त्यानंतर कंडीशनर चा वापर जरूर करावा. त्यामुळे केस कोरडे होणार नाहीत. स्नान करताना त्वचेसाठी सौम्य साबण वापरावा, व त्यानंतर बेसन आणि दह्याच्या मिश्रणाचा वापर करावा. अनेक लोक त्वचेवरील रंग उतरविण्यासाठी केरोसीन, कपड्यांचा साबण असल्या वस्तूंचा वापर करतात, या वस्तूंचा वापर तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. सण झाल्यानंतर त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मॉईश्चरायझरचा किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *