महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ नोव्हेबर । राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा (School) सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर उद्या 23 नोव्हेंबरला राज्य कोरोना (Corona) टास्क फोर्सच्या (Task Force) बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिह्यांची माहिती घेऊन पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील काय यासाठीची चाचपणी केली होती.
तर दिवाळीनंतर राज्यात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा दर आणि एकुणच परिस्थितीचा अभ्यास करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांच्या मार्फत शिक्षण सचिवांकडे पाठवला होता. त्यामुळे हा अहवाल पुढील मंजुरीसाठी राज्य टास्क फोर्सकडे पाठविण्यात आला आहे.शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा होणार असल्याने त्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यासाठी बैठकीत संमती मिळाल्यास राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील काही महिन्यांपासून शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीपर्यंतच्याही शाळा सुरू करण्याची मागणी विविध पालक आणि शैक्षणिक संघटनांनी केली होती. तर काही संघटनांनी लहान मुलांचा जीव धोक्यात घालून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यास विरोधही दर्शवला होता.