सातारा जिल्हा बँक निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । धक्कादायक निकाल सातारा जिल्हा बँक निवडणूकीत लागला असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शंभूराज देसाई यांचा सत्यजित पाटणकर यांनी पराभव केला. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजितसिंह पाटणकर यांचा 14 मतांनी विजय झाला आहे. 44 मते गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मिळाली, तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 58 मते मिळाली आहेत. शंभूराज देसाई यांचा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सातारा दिल्हा बँक निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

अवघ्या एका मताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली, तर विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीसाठी शशिकांत शिंदे यांचा पराभव हा मोठा धक्का समजला जात आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कराड सोसायटी गटात विजय झाला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1964 मतदारांपैकी 1892 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 96.33 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी आणि खटाव सोसायटीसाठी झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसलाय. बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *