महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने देशाच्या स्वातंत्र्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरातून तिच्यावर टीका झोड उठली. यानंतर तिने राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून ट्रोलर्सनेही कंगनाला लक्ष्य केलं होत. आता कंगना आपल्या या विधानामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ACJM III च्या न्यायालयात कंगना रनौत विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिवक्ता विकास तिवारी यांनी कंगना रनौतविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. तिवारी यांनी आरोप केला आहे की, त्यांनी 11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता विविध वर्तमानपत्रे, चॅनेल आणि सोशल मीडियावर पाहिले आणि ऐकले की, कंगनाने 1947च्या स्वातंत्र्याला भीक मागणे म्हटले आहे. असे वक्तव्य करून कंगनाने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप विकास तिवारी यांनी केला आहे. याशिवाय 16 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी महात्मा गांधींना अपशब्द बोलून देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपल्या भावना दुखावल्या असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांनी याविरोधात खटला दाखल करून आरोपींना समन्स बजावून शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.