निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांची मेहनत अन् पीक पाण्यातच ; भात शेतीवरील संकट कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । भंडारा जिल्ह्यातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे साठवणूक केलेल्या भातशेतीच्या गंजी पेटवून देण्याचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे पावसाचे थैमान कायम आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट आहेच पण शेतकऱ्यांचे परीश्रमही वाया जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असताना सोमवारी मध्यरात्री मोहाडी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सध्या भात धानाची कापणी सुरु आहे. मध्यंतरीही पावसामुळे कापणी कामे लांबणीवर पडली होती. आता कापणी सुरु असतानाच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कापणी केलेले धान पीक पावसाच्या पाण्यात तरंगत आहे. तर सदर धान पिकाच्या कडपा पुर्णतः पाण्याखाली गेल्या आहेत.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडले आहे. पिक काढणीच्या टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. खरिपात सोयाबीनचे नुकसान तर आता भंडारा जिल्ह्यात भातशेतीच्या उत्पादनावर पावसाचा परिणाम होत आहे. दिवाळी संपताच शेतकरी आपल्या धान पिकाची कापणी करून ठेवली असून अचानक पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या धान पिकात पाणी साचले आहे. मोठ्या कष्टाने भात शेतीची जोपासना शेतकऱ्यांनी केली होती. त्याच जोमात पिकही आले होते. मात्र, कापणीच्या दरम्यानच पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे मळणी कामे तर रखडली आहेच पण साठवणूक केलेल्या जागीच भात धानाला कोंभ फुटले आहेत.

पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी भात शेतीच्या गंजी उभारण्यात आल्या आहेत. असे असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने कामे तर रखडली आहेतच पण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भातशेती हे मुख्य पिक असताना आता या पिकाच्याच उत्पादनात मोठी घट होत असल्याने सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी मोहाडी तालुक्यातील सुभाफ लांजेवार, जयपाल मारबते तसेच इतर शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात साठवणूक केलेल्या भातशेतीच्या गंजी ह्या अज्ञातांकडून पेटवून दिल्या जात आहेत.

पावसापुर्वी कापणी झालेल्या 33 एकरातील भातशेतीच्या गंजी किन्हीझमोखे शिवारात लावण्यात आल्या होत्या. 17 शेतकऱ्यांनी एकाच ठिकाणी या गंजी लावल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री अज्ञात इसमांनी या गंजीला आग लावली. यामध्ये 17 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 25 हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भातशेतीची जोपासना करण्यासाठी एकरी 10 हजार रुपये खर्ची करावे लागले आहेत. तर भर पावसात कापणीची कामे शेतकऱ्यांनी केली होती. यातून उत्पादन तर सोडाच पण कोणत्या कारणावरुन हे कृत्य करण्यात आले याचा देखील अंदाज शेतकरी बांधू शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *