पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । पेट्रोल डिझेलचा वाढत्या किंमती आणि गाड्यांमधून होणारं प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक गाड्याकडे ओढा वाढला आहे. भारत सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर जुनी वाहनं आणि पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासठी सरकारने नवीन नियम आणि कायदे अस्तित्वात आणले आहेत. तर व्हेहिकल स्क्रॅप पॉलिसीही लागू आहे. तसेच इथेनॉलला इंधन म्हणून पर्याय आणण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद होतील, अशी चर्चा आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे, परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंदणी थांबणार नाही.”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमाला वर्चुअली संबोधित करताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

“सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याशिवाय इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही सरकारला वाढवायचा आहे.”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. “ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवणार नाही. मला वाटते की आम्हाला काहीही अनिवार्य करण्याची गरज नाही.”, असंही ते पुढे म्हणाले.

“लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत ​​असून या वाहनांची विक्रीही वाढली आहे. सुमारे २५० स्टार्टअप ई-वाहनांच्या विकासामध्ये गुंतले आहेत आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील.”, असंही ते पुढे म्हणाले. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे सांगून ते म्हणाले की, मी स्वतः पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार आहे. विमानात वापरल्या जाणार्‍या इंधनात ५० टक्के इथेनॉल वापरण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *