![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ नोव्हेबर । वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास व या व्यावसायिकांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी केवळ सरकारी योजनांवर अजिबात अवलंबून राहू नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच दिला. वाढत्या स्पर्धेत यंत्रमागाला टक्कर देण्यासाठी कापडाची गुणवत्ता दर्जेदार असणे तेवढेच गरजेचे आहे असेही ते म्हणाले. विणकर विकास व संशोधन संस्थेतर्फे दिल्लीत दोन दिवसीय विणकर धोरण राष्ट्रीय संमेलन झाले.
गडकरी म्हणाले, कापडाची गुणवत्ता उत्तम असेल तरच या क्षेत्राची प्रगती शक्य आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहायला हवेत. केवळ सरकारी योजनांवर अवलंबून राहून विकास होणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली तरच या क्षेत्राचा व पर्यायाने व्यावसायिकांचा विकास शक्य आहे.
प्रस्तावित चारधाम रस्ते विकास परियोजनेबाबत अपप्रचार होत आहे. ही योजना पूर्ण करताना सरकारने पर्यावरण रक्षणाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवल्याचे गडकरी यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरू आहे. १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ यांना जोडणारे ९०० किमी अंतराचे रस्ते बांधले जातील.