महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । केंद्र सरकारने फेटल मोटार अॅक्टमध्ये बदल केला असून, संबंधित असलेल्या सर्व गुन्ह्यांतील दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाचा देखील याबाबत लवकरच निर्णय येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता लवकरच दुप्पट दंड भरावा लागणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे पुण्यातील बालगंधर्व येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व ज्येष्ठ कलाकार उपस्थित होते.
राज्यात अपघातात दीड लाखांपेक्षा अधिक लोकांचे मृत्यू होतात. यात सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. हेच रोखण्यासाठी दंडाची रक्कम ( दुप्पट दंड ) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन लवकरच निर्णय घेणार आहे. अपघातामध्ये राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू होत आहेत. पुण्यात जरी अपघाती मृत्यू होण्याची संख्या नाशिकपेक्षा कमी असली तरी किरकोळ आणि गंभीर अपघातांची संख्या मात्र जास्त आहे. यात वाहचालकांना आपला हात-पाय व इतर अवयव गमवावे लागले आहेत, असेही ढाकणे यांनी सांगितले.