पुण्यात पुन्हा निर्बंध, चित्रपट गृह, नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० नोव्हेबर । शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता एक डिसेंबरपासून 100 टक्के सुरु होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 25 टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये 50 टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी 48 तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.

चित्रपट गृह, नाट्य गृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी असणार आहे. त्यामुळे 2 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे. संपूर्ण खुल्या जागेत कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांच्या उपस्थितीतच करावे असेही आदेश आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 1 हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील तर त्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *