महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । मुंबई कसोटीमध्ये फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आर. अश्विन याने दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा आणि हरभजन सिंग यांचा (Harbhajan Singh) विक्रम मोडला आहे. एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक बेळा 50 बळी घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर जमा झाला आहे.
वानखेडेवरील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर. अश्विन याने न्यूझीलंडचा सलामीवीर खेळाडू विल यंग याला बाद केले. या विकेटसह त्याने चौथ्यांना कॅलेंडर इयरमध्ये 50 बळी घेण्याची कामगिरी केली. याआधी त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये अशी कामगिरी केली होती.
अश्विनआधी अनिल कुंबळे यांनी 1999, 2004 आणि 2006 आणि हरभजन सिंग याने 2001, 2002 आणि 2008 मध्ये अशी कामगिरी केली होती. त्याआधी माजी खेळाडू आणि 1983 चा वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव यांनी 1979 आणि 1983 मध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये 50 बळी घेतले होते.
आर. अश्विन याने 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवले आहेत. अश्विनने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याला मागे सोडले आहे. आफ्रिदीच्या नावावर 2021 मध्ये 44 बळींची नोंद आहे, अश्विनच्या नावावर 50 बळी झाले आहेत.