महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । ऑटो मोबाइलचं जग आता हळू-हळू इलेक्ट्रिक व्हिकलकडे वळत आहे. अनेक इलेक्ट्रिक कार, स्कूटर, बाइक लाँच होत आहेत. सरकारदेखील अधिकाधिक इलेक्ट्रिक व्हिकलचा वापर वाढण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी याच्या किंमतीवर डिस्काउंट देत असून ई-व्हिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहे. इतकं असूनही लोकांचा इलेक्ट्रिक व्हिकलच्या चार्जिंग सुविधांमुळे या वाहन खरेदीकडे कल कमी असल्याचं चित्र आहे.
परंतु आता असं होणार नाही. लवकरच देशभरात पेट्रोल पंपांवरच इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याची सुविधा सुरू केली जाईल. येणाऱ्या काही काळात तुम्ही तुमचं इलेक्ट्रिक वाहन पेट्रोल पंपावर चार्ज करू शकाल आणि यासाठी पेट्रोल भरण्यासाठी जितका वेळ लागतो, तितकाच वेळही लागेल.अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे (Mahendra Nath Pandey) यांनी सांगितलं, की ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ई-व्हिकलसाठी फास्ट चार्जर (Fast Charger) डेव्हलप करत आहे. त्याशिवाय 22 हजार पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठीही सरकार चर्चा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवजड उद्योग मंत्रालय आणि तेल आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देशभरातील 22 हजार पेट्रोल पंपावर ई-व्हिकल चार्जर सिस्टम तयार करण्यासाठी चर्चा करत आहे. प्रत्येक महामार्गावर 25 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन (Charging Station) आणि शहरांत 3 किलोमीटर अंतरावर एक चार्जिंग स्टेशन असावं, अशी चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (Automotive Research Association of India- ARAI) सध्या ई-व्हिकलसाठी फास्ट चार्जर विकसित करण्यावर काम करत आहे. पुण्यातील एका संस्थेने आधीच चार्जरचा प्रोटोटाइप डेव्हलप केला आहे. फास्ट चार्जर पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत तयार केला जाईल, अशी माहिती आहे.
ही योजना अंमलात आल्यानंतर ई-वाहन खरेदी करणाऱ्यांची चार्जिंग बाबतची समस्या दूर होईल, असा सरकारचा दावा आहे. ई-वाहनाची बॅटरी लवकर चार्ज न होणं आणि चार्जिंग स्टेशनची कमी असल्याने दूरच्या प्रवासात होणारी असुविधा या सध्या लोकांच्या मोठ्या तक्रारी आहेत. परंतु फास्ट चार्जर आल्याने आणि पेट्रोल पंपावरच चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यास चार्जिंगसाठी लागणारा वेळेची समस्या दूर केली जाण्यास मदत होईल.