महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या न्यूझीलंडचा घरच्या मैदानावर १-०ने पराभव केल्यानंतर आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे पुढील लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहे. करोनाच्या नव्या वेरियंटमुळे भारताचा आफ्रिका दौरा ९ दिवस पुढे ढकलण्यात आलाय. या दौऱ्यासंदर्भात राष्ट्रीय निवड समिती लवकरच संघाची निवड करणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा, अभय कुरुविला आणि सुनील जोशी हे मुंबई कसोटीवर नजर ठेवून आहेत, तसेच सोमवारपासून सुरू झालेल्या बोर्डाच्या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यासोबत काही मोठे निर्णय घेणार आहेत. या निर्णयाचा भारतीय क्रिकेटवर दिर्घ काळासाठी परिणाम होऊ शकतो.
१) कसोटी संघाचा उपकर्णधार- गेल्या काही दिवसात एका बाजूला रोहित शर्माची कामगिरी चांगली होत आहे, तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेच्या कामगिरीत घसरण होत आहे. या सर्व पाश्वभूमीवर रोहित शर्माला कसोटी संघाचे उपकर्णधार केले जाऊ शकते. रोहितला याआधीच टी-२०चे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर वनडेमध्ये तो उपकर्णधार आधीपासूनच आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात रोहितकडे कसोटीचे उपकर्णधारपद दिले जाऊ शकते. बीसीसीआयकडून रोहित शर्माला आणखी पाठिंबा मिळू शकतो. ज्यामुळे भविष्यात तिनही फॉर्मेटमध्ये त्याचा समावेश होऊ शकेल.
२) वनडे संघाचा कर्णधार- टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे निवड समितीसमोर नवी अडचण निर्माण झाली. कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकच कर्णधार अशी परंपरा होती. आता विराटने फक्त टी-२०चे नेतृत्व सोडले आहे. वनडेचे नेतृत्व त्याच्याकडेच आहे. त्यामुळे निवड समितीसमोर ही परंपरा कायम ठेवायची की मोडायची असा प्रश्न पडलाय. बीसीसीआय आतापर्यंतची परंपरा कामय ठेवू शकते. आणि त्यामुळेच रोहित शर्माकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपले जाऊ शकते. यात आणखी एक मुद्दा म्हणजे, पुढील वर्षी भारत वनडे सामने अतिशय कमी प्रमाणात खेळणार आहे. त्यामुळे हा निर्णय थोडा उशीरा देखील घेतला जाऊ शकतो.
३) रहाणेच्या अडचणी वाढणार- श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच बरोबर मधळ्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारी सारखे दमदार पर्याय असताना अनुभवी रहाणेला अंतिम ११ मध्ये जागा टीकवणे सोपे असणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्या रहाणे आणि चेतेश्वर पुजार संघात असतीलच पण जेव्हा अंतिम ११ निवडण्याची वेळ येईल तेव्हा रहाणेचा विचार केला जाईल याबाबत शंका आहे. इतक नव्हे तर आफ्रिका दौऱ्यात रहाणेला वगळण्याचा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. अय्यरच्या यशस्वी पदार्पणाने रहाणेसाठी अडचणी वाढल्या आहेत. इतक नव्हे तर भारतीय अ संघाकडून खेळणारे प्रियांक पंचाल आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्या कामगिरीचा अजिंक्यवर दबाव असेल.
४) इशांतची जागा धोक्यात- गोलंदाजी विभागात इशांत शर्माचे स्थान धोक्यात असल्याचे दिसते. इंग्लंड दौऱ्यापासून त्याला लय सापडलेली नाही. या काळात मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली आहे. संघात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचे स्थान पक्के आहे. तिसरा गोलंदाज म्हणून सिराजची दावेदारी मजबूत झाली आहे. तर चौथा गोलंदाज म्हणून उमेश यादव हा इशांतपेक्षा वरचढ ठरतो. राखीव गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान अशी नावे आहेतच.
५) मोठा प्रश्न – आफ्रिका दौऱ्यातील संघ निवडीवेळी एका खेळाडूकडे सर्वांचे लक्ष असेल तो म्हणजे शिखर धवन होय. शिखरला वनडे संघात स्थान मिळेल की नाही याबाबत मोठा प्रश्नच आहे. ३६ वर्षीय शिखरने गेल्या ३ डावात ९८, ६७ आणि नाबाद ८६ अशा धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १७ शतक आहेत. त्यामुळे निवड समितीला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आता संघातील वाढत्या स्पर्धेमुळे त्याचे स्थान कायम राहते की नाही हे पाहावे लागले.