महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । कोरोना विषाणूनच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची झोप उडाली आहे. या व्हेरिएंटच्या संक्रमणाचा वेग याआधीच्या व्हेरिएंटहून अधिक जास्त आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये हा व्हेरिएंट हिंदुस्थानसह 40 देशांमध्ये पसरला आहे. हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 21 रुग्णांची नोंद झाली आहे.
नवा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने लॉकडाऊनच्याही अफवा उडत आहे, मात्र यात काहीही तथ्य नाही. केंद्र आणि राज्य सरकारने देखील याबाबत काही संकेत दिलेले नाहीत. मात्र या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग दहशतीखाली आहे आहे. असे असतानाही डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी लोकांना भितीत राहू नये, पण सावधान आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच या व्हेरिएंटबाबत काही अशा गोष्टी उजेडात आल्या आहेत ज्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळत आहेत.
एम्स बीबीनगरचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. विकास भाटिया यांनी नवा व्हेरिएंट जास्त संक्रमण करणारा पण कमी घातक असल्याचे ‘एएनआय’शी बोलताना सांगितले. असे असले तरी आपल्याला तिसऱ्या लाटेची तयारी करायला हवी असेही ते म्हणाले. ओमायक्रॉन जास्त जीवघेणा नाही. आतापर्यंत जगातील कोणत्याही भागात यामुळे मृत्यू झाल्याची बातमी आलेली नाही. हा एक सौम्य प्रकारचा ताप असू शकतो. मात्र अनेक देशांमध्ये संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी जास्त वेळ लागत आहे, असेही ते म्हणाले.
मुलांना जास्त संक्रमित करणार नाही
दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. परंतु INSACOG च्या सदस्यांनी हिंदुस्थानमधील लहान मुलांना हा व्हेरिएंट जास्त संक्रमित करणार नाही असे म्हटले आहे. NIBMG चे डायरेक्टर डॉ. सौमित्र दास यांनी मात्र याबाबत बोलणे घाईचे होईल असे म्हटले. कारण संक्रमित आजारांबाबत हिंदुस्थानमधील लोकांचे अनुभव दुसऱ्या देशांहून वेगळे असल्याचे ते म्हणाले.
गंभीर आजारी पाडत नाही
जगभरातील तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉन व्हेरिएंट रुग्णाला जास्त आजारी पाडत नाही. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लोकांना आणि याआधी कोरोनाची लागण होऊन गेलेल्या लोकांमध्ये याची सौम्य लक्षणे दिसत आहेत.
रुग्ण वाढले, पण…
दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला होता. परंतु ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले असले तरी खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडत आहे, असे राष्ट्रपती सायरिल रामाफोसा यांनी म्हटले. आरोग्य विभागाने देखील रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेतून आली चांगली बातमी
जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे. डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले की, सुरुवातीच्या संकेतांमधून असे दिसते की हा व्हेरिएंट डेल्टाहून कमी घातक आहे. तर सिंगापूरने हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करू शकतो असे म्हटले आहे.