ग्राहकांना झटका ! नवीन वर्षात या कंपन्यांची वाहनं महागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । स्वत:ची गाडी घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. नव्या वर्षात तुम्ही देखील आवडीचं वाहन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला 2022 मध्ये गाडी खरेदीसाठी जास्त रक्कम मोजावी लागेल. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors vehicle price hike) पुढील महिन्यापासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा परिणाम कमी करण्यासाठी जानेवारीपासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणार आहेत.

टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेस यूनिटचे प्रेसिडेंट शैलेष चंद्र यांनी अशी माहिती दिली आहे की, ‘कच्चा माल, सामान यासह अन्य वस्तूंचा खर्च सातत्याने वाढत आहे. कंपनीला कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा परिणाम कमी करण्यासाठी जानेवारीपासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढवाव्या लागत आहे.’

दुसरीकडे महागड्या मोटारसायकली बनवणाऱ्या (Ducati Price Hike) पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे सांगितले. कंपनीने सांगितले की, 1 जानेवारी 2022 पासून मोटरसायकलच्या सर्व प्रकारच्या मॉडेल्सच्या किमती वाढवण्यात येणार आहेत. सुधारित किमती सर्व मॉडेल्सवर लागू होणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

अलीकडेच, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2022 पासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत एमएसआयने म्हटले होते की, ‘गेल्या एका वर्षात कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे कंपनीसाठी काही अतिरिक्त खर्च किमतीत वाढ करून त्याचा भार ग्राहकांवर टाकणे अत्यावश्यक बनले आहे.’

मर्सिडीज-बेंझ इंडियाने सांगितले होते की कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे खर्चाची भरपाई करण्यासाठी 1 जानेवारी 2022 पासून केवळ निवडक मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ केली जाईल. तर ऑडी इंडियाने वाढत्या कच्च्या मालाच्या किमती आणि ऑपरेटिंग कॉस्ट भरून काढण्यासाठी किमतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. कंपनी आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *