संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू, 230 निलंबित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ डिसेंबर । एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून एसटी महामंडळाने मंगळवारी 230 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने 122 आगारांतील वाहतूक अंशतः चालू केली असून सायं. 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 2519 बसेसद्वारे वाहतूक सुरू ठेवत ग्रामीण भागातील जनतेला तसेच शालेय विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

एसटी महामंडळाच्या निलंबित कर्मचाऱ्यांना एक संधी देण्यासाठी त्यांना सोमवारपर्यंत हजर झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्याची भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतली होती. त्यानंतर मात्र महामंडळ पुढील कारवाई करेल असेही त्यांनी म्हटले होते. काल सोमवारी 149 निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यामुळे एसटी महामंडळाने आता कामावर हजर न झालेल्या निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून मंगळवारी 230 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात संभाजीनगर विभागातील 46, नागपूर विभागातील 48 आणि अमरावती विभागातील 136 अशा एकूण 230 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांना 14 दिवसांत उत्तर द्यावे लागणार असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर ठाम असून आतापर्यंत 21,644 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या 67,904 इतकी आहे. दरम्यान, 91 कर्मचाऱ्यांची अन्य आगारांत बदली करण्यात आली असून एकूण बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 2,572 इतकी झाली आहे. तर आज 38 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 10,370 इतकी झाली आहे. तर आज दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून एकूण सेवा समाप्त कर्मचाऱ्यांची संख्या आता 2031 इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *