महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ या तीन राज्यात ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या (India Omicron Cases) दोनच दिवसात १०० वरून १२६ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यानं आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, चंदीगढ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीचा क्रमांक लागतो.
कर्नाटकमध्ये ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण युकेवरून आला आहे. तर इतर पाच जण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील दोन शैक्षणिक संस्थांमधील आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवाशांशी काही संपर्क आला का हे तपासले जात आहे.
दुसरीकडे केरळमध्ये ओमिक्रॉनचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाचे वय १७ वर्ष असून दुसऱ्याचे ४७ वर्ष आहे. ही १७ वर्षीय व्यक्ती यूकेवरून तिरुवनंतरपुरमला आली आहे.
युगांडातून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथे परतल्यानंतर एक जोडपं आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची दुसरी मुलगी पाच वर्षांची असून तिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, तिची ओमिक्रॉनची चाचणी निगेटिव्ह आढळून आली.
कोणत्या राज्यात किती रुग्ण –
महाराष्ट्र – ४३
दिल्ली – २२
राजस्थान – १७
कर्नाटक – १४
तेलंगणा – ८
गुजरात – ७
केरळ – ११
आंध्र प्रदेश – १
तमिळनाडू – १
पश्चिम बंगाल – १