महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । तुळजापूर रोडवरील कचरा डेपो शेजारी इम्रान कुरेशी यांचा ट्रिपल ट्रेडिंग कंपनी व अलिम कुरेशी याचा वसी एन्टरप्रायजेस नावाचे दोन फर्म पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होते. जनावरांचे मांस, हाड व हाडांची भुकटी बनवून बेकायदेशीररीत्या डालडा बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. यासंबंधी हिप्परगा गावातील लोकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.
या कारखान्यात वीजचोरीही सुरू होती. या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी छापा घातला होता. या छाप्यात सव्वातीन लाख रुपयांहून अधिकची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात कुरेशी बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.