महाराष्ट्र २४- पुणे, : कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच अनेक अफवांनाही उधाण आलं आहे. कोरोनासंर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात अशीच एक अफवा पसरवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहात असलेल्या परदेशातील काही पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा या तरुणानं दिली होती. या तरुणानं एका हेल्पलाईनवरून या संदर्भात माहिती दिली होती आणि सोशल मीडियावरही अफवा पसरवल्यानं या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असतानाही पुण्यामध्ये सोमवारी हा प्रकार घडला. या तरुणाविरोधात कोरोगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज किंवा इतर फोटोही न तपासता फॉर्वड न करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेजना सुट्ट्या जाहीर केल्यात. विद्यार्थ्यांनी सुट्ट्या म्हणून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.