महाराष्ट्र गारठला ; तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । उत्तरेकडील थंड वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे ११.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. अन्य ठिकाणी ते सरासरीच्या जवळपास आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान
पुणे ११.५, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १२.५, नाशिक १२.५, सांगली १४.३, सातारा १३.२, सोलापूर १२.४, रत्नागिरी १८.५, औरंगाबाद १२, परभणी १३, नांदेड १४, अकोला १४.७, अमरावती ११.८, बुलडाणा १२.२, चंद्रपूर १३.६, गोंदिया ११.५, वाशिम १४, वर्धा १२.६. (अंश सेल्सिअस)

येत्या ४८ तासांत उत्तरेकडील वारे आपल्या राज्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे २१ डिसेंबरपासून पुणे शहरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात ते ८-९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. – डॉ. अनुपम कश्यप, प्रमुख, पुणे हवामान विभाग.

येत्या दोन दिवसात वायव्य भारत, गुजरात व महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय बदल होणार नाही. त्यानंतर किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल. – कृष्णानंद होसाळीकर, शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग.

हिमवर्षावामुळे उत्तर भारतात थंडीची लाट

– जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे देशातील उत्तर भागात आलेली थंडीची लाट आणखी दोन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

– जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी सुरूच असून लडाखमध्ये उणे २०.८ अंश सेल्सिअस तापमान आहे.

– हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थानचा काही भाग येथे थंडीचा कडाका खूपच वाढला आहे.

– १९ डिसेंबरला रात्री दिल्लीतील जाफरपूर परिसरात यंदाच्या माेसमातील सर्वात कमी ३.३ अंश सेल्सिअसची नाेंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *